“श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी”, अध्यक्षपदी कोपरगाव चे राष्ट्रवादी चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती!

Spread the love

“श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी”, अध्यक्षपदी कोपरगाव चे राष्ट्रवादी चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती!

 

संगमनेरच्या सुहास आहेर यांच्या नावाची घोषणा.

 

म मराठी न्यूज मिडिया/ज्ञानेश्वर गायकर

प्रलंबित असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ सदस्यांच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने आज दिनांक १६/९/२०२१ रोजी मुंबईत राजपत्राद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या पदसिद्ध पदासह बारा विश्वस्तांची नावे जाहीर केली आहेत. कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवं तरुण आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर काँग्रेस कार्यकर्ते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुहास आहेर यांचाही विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे.

मागील वर्षी राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासूनच शिर्डीच्या जगप्रसिद्ध श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवडीचा विषय चर्चेत होता . सध्या संस्थानचे कामकाज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या देखरेखीखाली नियुक्त समिती पाहत आहे. त्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड लवकरात लवकर व्हावी असाही दबाव उच्य न्यायालयाकडून सरकारवर होता.

त्यातच न्यायालयाच्या आदेशान्वये निवड प्रक्रिया राबवावी लागल्याने त्यातही मोठा विलंब झाला. मध्यंतरी विश्वस्त मंडळातील काही नावांच्या याद्याही सामाजिक माध्यमातून चर्चेत आल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र आता या सार्‍या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या असून राज्य सरकारने राजपत्राद्वारा विश्वस्त मंडळाच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता दिली आहे.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात अध्यक्षपदाची धुरा कोपरगावचे राष्ट्रवादीचे तरुण आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

तर, उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे,ते ही कायद्याचे पदवीधर आहेत. या विश्वस्त मंडळात बहुतेक पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याला स्थान मिळाले असून संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष, सुहास जनार्धन आहेर यांची संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राहता तालुक्यातील साकुरी येथील अविनाश आप्पासाहेब दंडवते, श्रीरामपूर येथील सचिन रंगराव गुजर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील मुंबई येथील राहुल नरेन कनाल, राहुरी येथील सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंतराव पुंडलिकराव जाधव, शिर्डीतील महेेंद्र गणपतराव शेळके व एकनाथ भागचंद गोंदकर आणि शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष अशा एकूण बारा जणांची नावे राज्य सरकारने आज राजपत्राद्वारे घोषीत केली आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर जगप्रसिद्ध साईबाबांच्या विश्वस्त संस्थेला नवे मंडळ मिळाले आहे. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून , विखे पाटील यांचे अनेक वर्षे असलेले वर्चस्व पूर्ण विराम झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat