शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे -धानपट्टयात दिली पावसाने हुलकावणी

Spread the love

 रोवण्या खोळंबल्या : शेतकरी झाले चिंतातूर

 

चंद्रपूर/ चिमूर :-     पावसाळ्याची सुरुवात होताच पावसाचे दमदार आगमन झाले त्यामुळे शेतकरी सुखावला होता. शेतकऱ्यांने शेतीच्या कामाला जोमाने सुरूवात करीत धानाचे पऱ्हे टाकले पण चालू आठवड्यात पावसाने पाठ फिरवली असून बळीराजा भविष्याची स्वप्न उराशी बाळगून पावसाची वाट पाहत आहे. बळीराजा पाऊस येईल या आशेने आकाशाकडे पाहत असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे.

दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते.पाऊस पडेल अशी आशा पल्लवित होतानाच पाऊस दगा देवून निघून जातो . दिवसभर उन्हाळ्या सारखे उन्ह तापू लागते. शेतकऱ्यांने पाऊस येईल या आशेने धानाच्या पऱ्हेवर खत मारल्यामुळे काही शेतकऱ्यांचे पऱ्हे करपू लागली आहेत . रोवणी जोगे पऱ्हे आहेत तर पाणी नसल्याने रोवणीची कामे खोळंबली आहे. दोन तीन दिवसात पाऊस आला नाही तर पऱ्हे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या तीन चार दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामूळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.

मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळांची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.यावर्षी तरी पीक चांगले येईल.या आशेने शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळात इकडून- तिकडून पैसा जमा करून धान्याची बिजाई घेऊन मशागत केली.मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.एक दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर ही चिंता आणखीच वाढणार आहे.

पऱ्हे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे एकीकडे पेट्रोल, डिझेल भाव वाढले तर दुसरीकडे विज वितरण कंपनी शेतकऱ्यांना ऐन हंगामात बील भरण्याचा तगादा लावत आहे त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतातुर झाले असून पऱ्हे कसे जगवावे असा प्रश्नही शेतक-यांसमाेर उभा झाला आहे .पाऊस यावा यासाठी शेतकरी वरुन राजाकडे सतत प्रार्थना करीत आहे.हे तितकेच खरे आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat